आ. मुंदडा यांच्या विजयासाठी मुस्लिम बांधवांची मोर्चे बांधणी.
केज: केज विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना आ. नमिता मुंदडा यांच्या समर्थकांत मोठी वाढ होत असतांना दिसत आहे. शहरामध्ये सोहेल कुरुशी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी नुकताच भाजपा मध्ये प्रवेश केला असून ते आ. नमिता मुंदडा यांच्या विजयासाठी सक्रिय झाले आहेत. विधानसभा सभा निवडणुकीचा प्रचार आता काही दिवस शिल्लक राहिला असल्यामुळे हा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. केज विधानसभा मतदारसंघातील अठरापगड जातींचे कार्यकर्ते आ. नमिता मुंदडा यांच्या प्रचारासाठी कामाला लागले असतांनाच भारतीय जनता पक्षाचे राजकीय विरोधक समजल्या जाणाऱ्या मुस्लिम समाजाचे भाजपामध्ये आता इनकमिंग वाढले आहे. आ. नमिता मुंदडा यांच्या वर असलेला वैयक्तिक विश्वास, ज्येष्ठ मार्गदर्शक नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या वर असलेल्या विश्वासामुळे हे इनकमिंग मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरातील कुरेशी मोहल्ला, बाराभाई गल्ली, झारेकरी गल्ली या गल्लीत मुस्लिम समाजाचे लोक अधिक प्रमाणात राहतात. याच विभागातील तरुण कार्यकर्ते सोहेल कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली अक्षय मुंदडा यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये नुकताच प्रवेश केला. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून तो सर्वधर्म समभाव विचार घेवून चालणारा पक्ष असून जे मुस्लिम बांधव राष्ट्रविचारसरणीचे आहेत त्यांच्या सोबत भारतीय जनता पक्ष हा सतत पाठीमागे राहिला आहे. केज विधानसभा मतदार संघातील ही होवू घातलेली विधानसभा निवडणुक जातीपातीच्या मुद्दा पेक्षा विकासाच्या मुद्यावर लढली जात असल्यामुळे या विभागातील सर्व समाजातील मतदार हा आ. नमिता मुंदडा यांच्या पाठीशी उभा असून या मतदारांना आम्ही कधीही अंतर देणार नाहीत असे अक्षय मुंदडा यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना सोहेल कुरेशी म्हणाले की, केज विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षाच्या कालावधीत विशेषतः शिंदे-फडणवीस आणि अजित पवार सरकारच्या कालावधीत आ. नमिता मुंदडा यांनी केलेली विकासकामे ही मतदारसंघाचा आणि अंबाजोगाई शहराचा कायापालट करणारी आहेत. त्यांच्या या विकासात्मक दृष्टिमुळेच आज शेकडो कार्यकर्त्यांनी आ. नमिता मुंदडा यांच्या मागे आपली संपूर्ण शक्ती उभी करुन त्यांना विजयी करण्याचा संकल्प केला आहे. हे सर्व कार्यकर्ते आ. नमिता मुंदडा यांच्या प्रचारात सक्रिय होतील व त्यांच्या गळ्यात विजयी हार घालतील असे त्यांनी सांगितले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.