माजलगाव: येथील उपविभागीय कार्यालयातील करकुनास तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बहाद्दर अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना बुधवार दिनांक 24 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली. कारवाई करण्यात येत असताना कर्तव्यदक्ष म्हणून गाजलेल्या माजलगाव उपविभागीय अधिकारी नीलम बाफना या मात्र जेवता जेवताच फरार झाल्या असल्याचे येथे उपस्थित नागरिकांमधून ऐकावयास मिळाले त्यामुळे छोटा मासा गळाला.. मोठा मासा पळाला अशी चर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय परीसरात ऐकावयास मिळत आहे. पकडलेले वाळूचे कंटेनर सोडविण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी उपविभागीय कार्यालय माजलगाव येथील कारकून वैभव बाबुराव जाधव यास सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार दिनांक 24 रोजी दुपारी साडेतीन वाजता 30 हजाराची लाच स्वीकारताच रंगेहाथ पकडले. यावेळी एसडीएम नीलम बाफना या कारकून जाधव ला कामाला लावून जेवण करत होत्या.कार्यवाही होत असल्याची चाहूल लागताच त्या पटकन आपला जेवणाचा डब्बा बंद करून कार्यालयातून एका खाजगी मोटरसायकलवरुन फरार झाल्याचे येथील काही उपस्थितांनी सांगितले. दरम्यान येथील उपविभागी कार्यालयामध्ये गौण खनिज आणि जात पडताळणीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालत होता. याबाबत अनेक तक्रारी देखील झालेल्याच आहेत. तसेच या कारवाईत जो कर्मचारी पकडला आहे तो वैभव जाधव याची सहा महिन्यापूर्वी येथील तहसील कार्यालयात आयुक्त यांच्याकडे झालेल्या तक्रारीवरून बदली झालेली आहे, परंतु त्यास केवळ अर्थ जमाविण्याचे काम हे व्यवस्थित बिनबोभाट जमत असल्यामुळे त्याला या कार्यालयातून तहसील कार्यालयात जाऊ दिले नाही अशी चर्चा असून या कार्यवाहीदरम्यान छोटा मासा जरी गळाला लागला असला तरी मोठा मात्र पळाल्याने पुढे यात काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.