धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथील वीज अंगावर कोसळून महिला ठार.
किल्लेधारुर : शेतात काम करताना पाऊस आल्याने सागाच्या झाडाखाली थांबलेल्या महिलेच्या अंगावर वीज कोसळून सदर महिला ठार झाल्याची घटना धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथे आज शुक्रवारी ( दि. २९ ) रोजी दुपारी घडली असून, या घटनेने सोनिमोहा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रीमती संगीता मच्छिंद्र कराड ( वय ४८ वर्ष ) रा. डुकडेगाव ( ता. वडवणी ) हल्ली मुक्काम सोनिमोहा ( ता. धारुर ) असे मयत महिलेचे नाव आहे. या बाबत अधिक माहीती अशी की, मच्छिंद्र कराड हे मागील काही वर्षांपासून सोनिमोहा येथे स्थायिक झाले असून त्यांनी धुनकवड पाटी जवळ दीड एकर शेती खरेदी घेतली आहे. याच शेतात मच्छिंद्र हे जनावरे चारत होते, तर त्यांच्या पत्नी संगीता या शेतात काम करत होत्या. आज शुक्रवारी दुपारी या भागात वीजेच्या कडकडाटासह पाऊस चालू होता. पाऊस आल्याने संगीता मच्छिंद्र कराड या बाजुलाच असलेल्या सागवानाच्या झाडाखाली थांबल्या होत्या. यावेळी कडकडाटासह वीज या झाडावर कोसळली; या वीजेचा जोरदार धक्का लागून शेतकरी महिला संगीता मच्छिंद्र कराड या ठार झाल्याची घटना घडली. ही बातमी कळाताच गावावर शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत संगीता कराड यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.