आश्रमशाळा की छळछावण्या? बीडमध्ये संस्थाचालकांच्या गुंडगिरी आणि छळाविरोधात शिक्षकांचा एल्गार; उच्चस्तरीय ऑडिटची मागणी!
विशेष प्रतिनिधी /बीड: शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. निवासी आश्रमशाळा चालवणाऱ्या काही मुजोर संस्थाचालकांकडून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना गुलामासारखी वागणूक दिली जात असून, त्यांचा छळछावणीसारखा मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप पीडित शिक्षकांनी केला आहे. काल सहाय्यक समाज कल्याण संचालकांच्या दालनासमोरच एका महिला कर्मचाऱ्याच्या पतीला संस्थाचालकाने अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, आता जिल्ह्यातील इतरही अनेक पीडित शिक्षकांनी समोर येत या छळवादाचा पाढा वाचला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे बीड जिल्ह्यात खळबळ माजली असून मुजोर संस्थाचालकांवर कठोर कारवाई करून आश्रमशाळांचे उच्चस्तरीय ऑडिट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. इंग्रजांपेक्षाही भयंकर जुलूम; शेतात खुरपणी ते घरची धुनी-भांडी! पीडित शिक्षकांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासन कोट्यवधी रुपयांचे अनुदान देते आणि कर्मचाऱ्यांचा पगारही शासनच करते. मात्र, संस्थाचालक स्वतःला मालक समजून कर्मचाऱ्यांना वेठबिगाऱ्यासारखे वागवतात. महिला कर्मचाऱ्यांना निवासी शाळेत काम करण्याऐवजी संस्थाचालकांच्या घरी धुनी-भांडी करणे, फरशी पुसणे, तसेच त्यांच्या शेतात नेऊन कापूस वेचणे व खुरपणी करण्याची कामे अलिखित नियमावलीनुसार सक्तीने करून घेतली जातात. पुरुषांना ड्रायव्हर म्हणून किंवा संस्थाचालकांच्या घराच्या व शाळेच्या बांधकामावर मजूर म्हणून राबवून घेतले जाते. नकार दिल्यास ‘मस्टर’वर (हजेरी पटावर) सह्या करू न देणे, पगार रोखणे किंवा थेट नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. जर मागील १५ दिवसांचे आश्रमशाळांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तर अनेक कर्मचारी शाळांऐवजी संस्थाचालकांच्या घरी किंवा शेतात काम करताना आढळतील, असा खळबळजनक दावाही शिक्षकांनी केला आहे. अधिकारी आणि संस्थाचालकांचे आर्थिक संगणमत; भरती आणि एरियसमध्ये लूट! ”शिक्षण महर्षींची थोर परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आज काही संस्थाचालकांमुळे ‘शिक्षण माफिया’ आणि ‘शिक्षण सम्राट’ तयार झाले आहेत,” असा घणाघाती आरोप महाराष्ट्र आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
शिक्षक भरती करताना कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले जातात, आणि त्यानंतर पाचवा-सहावा वेतन आयोग किंवा एरियसचे (थकबाकी) पैसे मंजूर करून घेण्यासाठी शिक्षकांकडून टक्केवारीची व लाचेची उघड मागणी केली जाते. केज येथील सर्वच गैरप्रकारात अग्रक्रमावर असलेल्या साने गुरुजी निवासी विद्यालयातील एका पीडित शिक्षकाने सांगितले की, १९९८ पासून सेवा करूनही केवळ माहिती अधिकारात पाचव्या वेतन आयोगाची माहिती मागितली म्हणून त्यांना बेकायदेशीरपणे सेवेतून काढून टाकण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात समाज कल्याण विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी संस्थाचालकाला पाठीशी घालत खोटा अहवाल तयार केला, ज्यामुळे शिक्षकाला न्यायासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागली. महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! आश्रमशाळांमध्ये काम करणाऱ्या स्वयंपाकी, मदतनीस, कामाठी आणि महिला अधीक्षक यांची मोठी पिळवणूक होत आहे.
नियमानुसार रजा मागितल्यास त्यांना स्वतःच्या पैशाने बदली बाई कामावर ठेवावी लागते. अनेक ठिकाणी लाकडावर स्वयंपाक करावा लागतो. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, भीतीपोटी आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे अनेक महिला कर्मचारी व मोठ्या वर्गातील विद्यार्थिनींवर होणारे लैंगिक शोषणाचे व ब्लॅकमेलिंगचे प्रकार पडद्याआड राहतात, ते समोर येत नाहीत. शाळा तपासणीच्या २०० गुणांच्या समित्या केवळ नावापुरत्या असून अधिकारी आणि संस्थाचालकांच्या संगणमताने हा काळा बाजार सुरू असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा! काल समाज कल्याण कार्यालयाच्या आवारात घडलेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर पीडितांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कार्यालयाकडून अद्याप कोणतीही कडक पावले उचलली गेलेली नाहीत, याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मुजोर शिक्षण माफियांविरोधात आता कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र आश्रमशाळा संघटनेचे राज्य सरचिटणीस राजकुमार कदम, तांदळे सर, राज्य अध्यक्ष पुंडे सर आणि बालाजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच तीव्र आंदोलन आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.