बीड : गुन्हेगारी, भ्रष्टाचार, गैरप्रकार व जुगाराचा अड्डा बनलेल्या बीड जिल्ह्यात नवनाथ कावत सारखे पोलीस अधीक्षक आल्यापासून जिल्ह्यातल्या गैरप्रकारांचा संथ गतीने का होईना परंतु, जुगारी अड्ड्यांचा बिमोड करण्यात त्यांना यश येत असतानाच अंबाजोगाई परिसरातील एका हॉटेलमध्ये दररोज लाखो रुपयांच्या चालू असलेल्या तिर्रट नावाच्या जुगार अड्ड्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयांचा ऐवज जप्त करत अनेक जुगारीना जेरबंद करण्याच्या कारवाईमुळे बीड पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, शेपवाडी परिसरातील हॉटेल ‘उमेश’ बिअर बार मध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळला व खेळवला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून ११ जणांना अटक केली. यावेळी एकूण १३ लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शेपवाडी परिसरातील उमेश बिअरबार येथे जुगार सुरू असल्याची गुप्त माहीत शहर पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे संध्याकाळी ७.३० वाजता शहर पोलिसांच्या पथकाने बारवरील वरच्या मजल्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना तेथे काही जुगारी गोलाकार पद्धतीने बसून जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी त्या ठिकाणाहून नगदी रक्कम, विविध प्रकारचे मोबाईल फोन्स आणि स्कॉर्पिओ वाहन असा एकण सुमारे १३ लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार खेळताना अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये रविशंकर मुंडे (वरवटी), धनराज फड (कन्हेरवाडी), कुलदीप शेप, नितीन शेप, विराज काटकर, आप्पाराव लाड, किशोर उंदरे, धनराज चाटे, अमोल पाचंगे, सतीश शेप, प्रदीप शेप (सर्व अंबाजोगाई व परळी परिसरातील) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनित कॉवत, अपर अधीक्षक चेतना तिडके, उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोउपनि आनंद शिंदे आणि पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, श्रीकृष्ण वडकर, दत्तात्रय इंगळे, पांडुरंग काळे, हनुमंत चादर, रविकुमार केंद्रे, प्रविणकुमार गित्ते, भागवत नागरगोजे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे करत आहेत. अशाच प्रकारचा जुगार्याचा नंगानाच बीड जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू असून , जिल्ह्यातली गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टीने हे जुगारी अड्डे उध्वस्त करण्यात यावेत अशी सर्वसामान्य नागरिकांमधून मधून मागणी होत आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.