गोविंदा आला रे आला!! गोविंदा अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत, वायव्य मुंबईतून अमोल किर्तीकरांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित!
मुंबई : अभिनेता गोविंदा अहुजा याने आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून, मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत “वर्षा” बंगल्यावर हा पक्षप्रवेश झाला असून, गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाकडून या जागेवर अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.बुधवारी रात्री अभिनेता गोविंदानं कृष्णा हेगडे यांची भेट घेतली होती. गोविंदा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. गोविंदाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याची कृष्णा हेगडे यांनी सांगितलं होतं. उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी गोविंदाच्या रूपात शिवसेनेकडून नवीन चेहरा उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटात गेल्यानंतर गोविंदाने शिवसेनेत प्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. गेल्या 14 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर आता पुन्हा राजकारणात प्रवेश करतोय असं तो म्हणाला. वयाच्या कारणास्तव शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर हे निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा असल्याने एकनाथ शिंदे या ठिकाणी नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. त्यासाठी अक्षय कुमार, माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांनी राजकारणात यायला नकार दिला होता. पण आता गोविंदाच्या रुपात त्यांना उमेदवार मिळाला असून ठाकरेंच्या अमोल किर्तीकर यांना तगडी लढत मिळणार असल्याचं दिसतंय. गोविंदाला राजकारणाचा अनुभव चांगला अनुभव असून, अभिनेता गोविंदा याने 2004 साली उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता. गोविंदाची प्रसिद्धी लक्षात घेता त्याला तिकीट देऊन काँग्रेसने भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. नंतरच्या काळात गोविंदाने राजकारणाला रामराम करत पुन्हा एकदा अभिनयाकडे मोर्चा वळवला. पण आता पुन्हा एकदा त्याने राजकारणात एन्ट्री केलीय. अमोल किर्तीकरांच्या रुपात उद्धव ठाकरे यांनी वायव्य मुंबईतून तगडा उमेदवार दिला आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे हे नवीन आणि लोकप्रिय चेहऱ्याच्या शोधात होते. त्यामुळे गोविंदाला त्यांनी पक्षात घेतल्याची माहिती आहे. आता गोविंदा हा अमोल किर्तीकरांचं आव्हान पेलणार हे जवळपास निश्चित झालं असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.