महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरण व महिला अधिकाऱ्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक.
पालघर:- महिला विकास व नारी सशक्तीकरणात महाराष्ट्र हा देशाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे सांगून राज्यातील महत्त्वाच्या पदांवर असलेल्या महिला अधिकाऱ्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.पालघर येथे आयोजित वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभात प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी राज्यातील महिला सशक्तीकरण व महिला अधिकाऱ्यांचे जाहीर सभेत कौतुक केले. श्री. मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक उच्च पदांवर महिला अधिकारी अतिशय सक्षमपणे शानदार काम करत आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक या राज्यातील प्रशासनला मार्गदर्शन करत आहेत. पहिल्यांदाच राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला या नेतृत्व करत आहेत. पहिल्यांदाच राज्याच्या वन संरक्षण बलाच्या प्रमुखपदी सौमिता बिश्वास नेतृत्व करत आहेत. राज्याच्या विधी विभागाच्या प्रमुख म्हणून सुवर्णा केवले या जबाबदारी सांभाळत आहेत. राज्याच्या प्रधान अकाऊंटंट जनरल पदी जया भगत यांनी तर मुंबईतील कस्टम विभागाची धुरा प्राची स्वरूप सांभाळत आहेत. तर मेट्रो तीनचे नेतृत्व व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातही महिला नेतृत्त्व करत असल्याचे सांगून महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानेटर आणि पहिल्या कौशल्य विकास विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला. अशा अनेक महत्त्वाच्या मोठ्या जबाबदारीच्या पदांवर महाराष्ट्रातील नारीशक्ती उत्कृष्ट कार्य करत आहे. विसाव्या शतकातील नारीशक्ती समाजाला नवी दिशा देण्यासाठी तयार आहे. ही नारीशक्तीच विकसित भारताचा मोठा आधार असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.