राहुरी येथील वकील दाम्पत्य खून खटल्यात अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती.
नगर:महाराष्ट्राच्या न्यायविश्वाला हदरा दिलेल्या राहुरी तालुक्यातील आढाव वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.वकील पती-पत्नी दोघांचाही खून करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.राहूरीमध्ये घडलेल्या या दुहेरी खून खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी ते नगरच्या न्यायालयात हजर झाले.राहुरी येथे घडलेल्या खून खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, राहुरी येथील ऍड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी ऍड. मनीषा आढाव या वकील दाम्पत्याचे 25 जानेवारी 2024 रोजी अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला होता. त्याच दिवशी रात्री तालुक्यातील उंबरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत आढाव दाम्पत्याचे मृतदेह आढळन आले होते. याप्रकरणी पोलिसांनी किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (रा. उंबरे), भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा), शुभम संजित महाडिक (रा. मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे), बबन सुनील मोरे (रा. उंबरे) या पाच आरोपींना गजाआड केले होते. ठिकठिकाणच्या वकील संघाकडूनच्या मागणीची दखल घेत या हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. दरम्यान, जिह्यासह राज्यभरातील वकील संघाकडून मोर्चे व आंदोलन करीत हा खटला जलदगती न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. खून खटला 6 मे 2024 रोजी नगर न्यायालयात सुरू झाला असून, ऍड. आढाव दाम्पत्य खून खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर झाले आहेत. आरोपी किरण दुशिंग याच्या वतीने एस. एस. पाठक व आरोपी हर्षल दत्तात्रय ढोकणे याच्या वतीने पी. के. फळे हे वकील हजर झाले आहेत. दरम्यान, आरोपी हर्षल दत्तात्रय ढोकणे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला. आरोपी शुभम संदीप महाडिक यानेही माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. सदर खटला नगर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. यारलागड्डा यांच्यासमोर सुरू झाले असून, या खून खटल्यात विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून एॅड.उज्ज्वल निकम काम पहात आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.