केज येथील रामराव पाटील मा.वि.चा मुख्याध्यापक लाचखोरी करतांना रंगेहात पकडला! शिक्षण क्षेत्रात पुन्हा खळबळ!
बीड: शिक्षणक्षेत्रात भयानक काळी कृत्ये आणि भ्रष्टाचार वाढलेला असतांनाच केज शहरातील एका नामांकित आणि एका मा.मंत्र्यांच्या शिक्षण संस्थेतील माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक लाचखोरी करतांना बीड च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडला असून,त्याचेवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे. या बाबत सविस्तर वृत्तांत असा की,केज शहरातील मा.मंत्री अशोकराव पाटील यांच्या “माऊली विद्यापीठ ” संचलित रामराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे आरोपी मुख्याध्यापक श्री धनराज सखाराम सोनवणे रा.सारणी (आनंदगाव) यांनी शाळा सोडण्याच्या प्रमाण पात्राच्या दुय्यम प्रति (T.C.) साठी तक्रारदारास रु.3000 ची मागणी केली होती. तक्रारदाराला अशा प्रकारची लाच देण्याची ईच्छा नसल्याने तक्रारदाराने बीड च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली .बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गुन्ह्याची पडताळणी केली. तक्रारदारास 12वी पास च्या टि.सी.ची दुय्यम प्रत देण्यासाठी लोकसेवक मुख्याध्यापक सोनवणे यांनी पंचासमक्ष रु.3000/ लाचेची मागणी करुन लाचरक्कम स्वीकारण्याचे मान्य करुन 3000 रु.स्विकारत असता त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून,शिक्षण क्षेत्रातल्या या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.