‘सुप्रिया सुळेंनी मांसाहार करून मंदिरात घेतली सभा’, फोटो दाखवत भाजपचा आरोप.
पुणे : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर याच वर्षी मार्च महिन्यामध्ये एक आरोप झाला होता. आरोप करणारे नेते होते शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे आणि त्यांनी आरोप केला होता, मांसाहार करून देवदर्शन केल्याचा. आता तसाच आरोप सुप्रिया सुळे यांच्यावर भाजपकडून करण्यात आला आहे. काही फोटो दाखवत भाजपकडून खासदार सुळेंनी मांसाहार करून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सभा घेतल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पवार कुटुंबातील सदस्य आस्तिक आहेत की नास्तिक, हा मुद्दा बऱ्याचदा चर्चेत आला आणि येतो. पण, खासदार सुप्रिया सुळेंचा इंदापूर दौरा वेगळ्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुकमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहार करून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सभा घेतल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड . शरद जामदार यांनी केला आहे. खासदार सुप्रिया सुळे गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करीत आहेत. गुरुवारी त्या इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक गावात भेटीसाठी गेल्या होत्या. यावेळी एका कार्यकर्त्याच्या घरी त्यांनी जेवण केले आणि त्यानंतर गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सभा घेतली.सुप्रिया सुळे यांनी जेवणात मांसाहार केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यासंदर्भातील काही फोटो भाजपकडून दाखवण्यात आले आहेत. सुप्रिया सुळे मांसाहार करून मंदिरात गेल्या आणि त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या, असं भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांचं म्हणणं आहे.या प्रकारानंतर गावातील कार्यकर्त्यांनी ‘सुप्रिया सुळे यांनी अनेकदा हिंदू धर्मियांच्या अशा पद्धतीने भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आत्मक्लेष करून या प्रकाराची माफी मागावी, अन्यथा त्यांना तालुक्यात फिरू देणार नाही’, असा इशाराही जामदार यांनी दिला आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.