केज तालुक्यातील मस्साजोगच्या सरपंचाची अपहरण करुन हत्या.
ग्रामस्थांचे रस्ता रोको करत ठिय्या आंदोलन.
तीन आरोपी पकडल्याची पोलिसांची माहिती.
केज : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची अतिशय भयानक घटना बीड जिल्ह्यात घडली असून,केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख असं सरपंचाचे नाव असून, त्यांचा मृतदेह केज परिसरात आढळून आला आहे. या बाबतची सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि त्यांचा भाऊ शिवराज देशमुख धारूर हून मस्साजोगकडे जात असताना अनोळखी इसमांनी गाडी आडवी लावून सरपंचांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. जुन्या भांडणाची कुरापत काढून हा खून झाल्याचा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाने केला आहे. सरपंचाचे भाऊ शिवराज देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय. देशमुख यांचा मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणल्या नंतर दवाखान्यावर मोठा जमाव जमला होता. नेमका प्रकार काय? याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोग कडे जात असताना डोणगाव जवळ दोन वाहणातून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून गाडीची तोडफोड करून संतोष देशमुख यांचे अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती मात्र काही तासानंतर बोरगाव – दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित होते.त्यांनी मस्साजोग ग्रामपंचायत ला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमका हा घातपाताचा प्रकार कसा व का घडला याचा तपास केज पोलीस करत आहेत. ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन.
मस्साजोग, केज मध्ये वाहतूक ठप्प दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास कडक्याच्या थंडीत मस्साजोग बसस्थानकासमोर ठिय्या देत रस्तारोको केला. सर्व आरोपींना अटक करा, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मस्साजोगमधील वृद्ध, महिला, ग्रामस्थांनी केली. रस्तारोकोमुळे दोन्ही बाजूने तब्बल ५ किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. काही वाहनधारक आरणगांव, जाधवजवळा मार्गे तर काही पिंपळगाव, विडा, येवता मार्गे पुढे गेले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, पहाटे दीड वाजता पोलिसांनी तीन आरोपी पकडल्याची माहिती दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, आज सकाळी सात वाजेपासून पुन्हा एकदा ग्रामस्थांनी सर्व आरोपींच्या अटकेची मागणी करत मस्साजोग येथे तर सकाळी साडेदहा पासून केज येथे रस्तारोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे पुन्हा एकदा मस्साजोग ते केज महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होऊन मोठ्याप्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
तीन आरोपी पकडल्याची माहिती.
सोमवारी सायंकाळी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी दोन पथकाच्या माध्यमातून तपास सुरू केला. आरोपी जीपमधून वाशीकडे जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नांदुर ते वाशी रस्त्यावर पाठलाग केला. तसेच वाशी पोलिसांना माहिती देऊन पुढे रस्ता अडविण्यात आला. यामुळे जीप मध्येच उभी करून आरोपी पसार झाले. मागावर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.