Entertainmentताज्या घडामोडीफिल्मी दुनियामहाराष्ट्र
शिस्तबद्ध आणि विद्यार्थी प्रेमी शिक्षक डी एल नागरगोजे बापू गुरुजींच्या अमृतमयी जीवनाचा आज अमृत महोत्सव…!
पाठलाग न्यूज :

शिस्तबद्ध आणि विद्यार्थी प्रेमी शिक्षक डी एल नागरगोजे बापू गुरुजींच्या अमृतमयी जीवनाचा आज अमृत महोत्सव…!
सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी आदरणीय डी. एल. नागरगोजे गुरुजी उपाख्य बापू हे आज दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त बीड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदरणीय गुरुजींच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित त्यांनी आमच्यावर केलेल्या मूल्य संस्काराबद्दल प्रथमतः मी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना शतशः वंदन करतो. हे वर्ष त्यांच्या जीवनातील एका विशेष टप्प्याचे प्रतीक असून, ज्यामध्ये त्यांनी शिक्षण, संस्कार आणि सेवा यांचा अद्वितीय मिलाफ घडवून अनेकांना प्रेरित केले आहे. गुरुजींनी तीन दशके शिक्षणाच्या उदात्त सेवेत स्वतःला समर्पित केले. विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. एक आदर्श शिक्षक कसा असतो याचा वस्तुपाठ स्वतःच्या वर्तणुकीतून घालून दिला. एखाद्या शिक्षकाकडे असायला हवी अशी उत्कृष्टता, उत्कटता आणि अध्यापन कलेत नाविन्यपूर्णता आणण्यासाठी जी वचनबद्धता लागते ती त्याच्यात ओतपोत भरलेली होती हे आम्ही वेळोवेळी अनुभवले. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत पारंपारिक आणि आधुनिक दृष्टिकोनांचे परिपूर्ण मिश्रण होते.
त्यामुळे गणितासारख्या क्लिष्ट विषयातील जटिल संकल्पना देखील ते सहज सोप्या करून सांगत. एखाद्या दिर्घोत्तरी गणिताची टप्प्याटप्प्यात विभागणी करून त्याची काठिण्य पातळी कमी करत शिकवण्याची त्यांची पद्धत माझ्यासारख्या साधारण क्षमतेच्या विद्यार्थ्याला देखील त्या विषयाची रुची निर्माण करणारी ठरली. गणित हा विषय आकलनासाठी तसा कठीण आणि क्लिष्ठ, परंतु गुरुजींनी त्यांचे कौशल्य वापरून आमच्यासाठी हा विषय आकलन सुलभ बनवला, त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात गणिता विषयी असलेल्या भीतीची पारंपरिक संकल्पना काढून टाकून एक आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या सहज सोप्या अध्यापनशैलीमुळे अनेकांना गणित विषयाची आवड निर्माण झाली. अध्यापणादरम्यान त्यांची शिस्त, अध्यापनातील सातत्य आणि विद्यार्थ्याप्रति असणाऱ्या समर्पक वृत्तीमुळे वर्गात एक आश्वासक शैक्षणिक वातावरण तयार होत असे. अध्यापनातील उत्स्फूर्तता, शिस्त, आणि प्रत्येक विद्यार्थ्यांशी असलेले आपुलकीचे नाते हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष गुण म्हणावे लागतील. त्यांनी फक्त गणित शिकवले नाही तर त्यायोगे जीवनाचे सूत्र कसे उलगडायचे याचे धडेही अधूनमधून आम्हाला दिले. त्यांचा ७५ वर्षांचा जीवनप्रवास हा एक अमृतकुंभ असून तो संघर्ष, मेहनत आणि सेवाभावाने भरलेला आहे याचे आम्ही साक्षीदार आहोत. विडा येथे कार्यरत असताना त्यांनी अर्धी सेवा नियमितपणे दररोज दहा ते बारा किमी तत्कालीन खडतर रस्त्यावरून सायकलवर प्रवास करत पूर्ण केली. विशेष म्हणजे अनेक वेळा विद्यार्थी शाळेत येण्यापूर्वीच गुरुजी शाळेत हजर असत. यावरून त्यांची सेवेप्रति निष्ठा, समर्पण आणि मेहनत लक्षात यावी. गुरुजी केवळ शिक्षकच नव्हते, तर आमच्यासाठी मार्गदर्शक, सल्लागार, कधी प्रेमळ आणि तितकेच कठोर पालकही होते. शाळेच्या मधल्या सुट्टीत ए नंदीबैल म्हणून दरडावणीच्या स्वरात गुरुजींची हाक कानी पडताच ती आपल्यासाठीच असणार याची खात्री असणारे जे दोन तीन जीवजंतू शाळेत होते त्यातील मी एक • अंगी भिनलेली खोडकर वृत्ती त्याला कारणीभूत. मग काय खाली वाकवून पाठीच्या चारपाच इंच क्षेत्रफळावर एकाच जागी फटाक्यांच्या लडीप्रमाणे चापटांचा भडिमार ठरलेलाच ! अशा प्रकारे शिक्षा करण्याची त्यांची पद्धत मात्र अफलातून होती. त्यात मी आणि नंदकुमार देशमुख तर त्यांची रोजची हक्काची गिऱ्हाईके, अर्थात अशा शिक्षेत वर्तणुकीतील बदलाची प्रामाणिक अपेक्षा असायची हा भाग निराळा ! त्यांनी केलेल्या मूल्य संस्कारामुळे त्यांनी शेकडो कुटुंबांचे आयुष्य उजळवले. गुरुजींची अध्यापनाच्या क्षेत्रातील दीर्घ सेवा ही केवळ ज्ञानदानापुरती मर्यादित नाही; तर त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणला. त्यामुळेच आमच्यासाठी गुरुजींचे योगदान वर्गाच्या पलीकडे आहे. आमच्यासाठी ते एक मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत आहेत. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ योगदान आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या आदरणीय गुरुजींच्या अमृतमयी जीवनाचा अमृत महोत्सव साजरा करताना आम्हाला मनस्वी अभिमान वाटतो. त्यांचा अमृतकाळाचा हा प्रवास त्याग, समर्पण आणि कठोर परिश्रमांनी भरलेला आहे. म्हणूनच अमृत महोत्सव म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची एक संधी आहे. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना केवळ शिष्य म्हणून नव्हे, तर एक भावी जबाबदार नागरिक म्हणून तयार केले आहे. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना आम्ही केवळ त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा नैमित्तिक सन्मान करणार नसून यापुढेही त्यांचे ज्ञान आणि त्यांच्या सेवा समर्पणाचा सदैव सन्मान करत राहू ! शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ असलेल्या आमच्या गुरुजींच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्हा सर्व शिष्यांच्या वतीने त्यांना मनःपूर्वक वंदन! त्यांना शतकोत्तर दीर्घायुष्यासोबत उत्तम आरोग्य, भरभराट आणि यश लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.