शिक्षण विभागात कर्मचारी भरतीची कागदपत्रे अपलोड करा अन्यथा गुन्हे दाखल करण्याची कारवाई.फौजदारी कारवाईच्या आदेशामुळे बोगस शिक्षक आणि संस्थाचालकांना धडकी!
बीड/प्रतिनिधी:बोगस शिक्षक भरती प्रकरणात दोषी असलेल्या शिक्षक आणि संस्थाचालकांचे पोलखोल करणारा आदेश शिक्षण आयुक्त यांनी काढला आहे. 2012 ते 2025 या काळात भरती झालेल्या सर्व शिक्षक, कर्मचारी यांची कागदपत्र अपलोड करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. कागदपत्र अपलोड न केल्यास कारवाई केली जाईल असा ईशारा सचिन्द्र प्रताप सिंग यांनी दिला आहे. बोगस भरतीला आळा घालण्यासाठी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार ७ जुलै २०२५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे दस्तऐवज विभागीय शिक्षण उपसंचालक व मंडळाच्या अध्यक्षांमार्फत पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच, सन २०१२ ते २०२५ या कालावधीत ज्यांना शालार्थ आयडी देण्यात आले आहेत, अशा सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचेही कागदपत्रे ३० ऑगस्ट २०२५ पूर्वी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळा व्यवस्थापनांवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या आदेशात देण्यात आला आहे. ‘शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न सुरू झालेले असून, त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णायक टप्पा आहे. राज्यातील सर्व शाळांनी ३० ऑगस्ट 2025 पूर्वी ही कार्यवाही पूर्ण करावी, अन्यथा शिक्षण विभाग गंभीर दखल घेईल,’ असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, माजी आमदार नागो गाणार यांनी देखील सर्व शाळांना त्वरित आणि पारदर्शक पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याबाबत पत्र पाठविली आहेत. “--त्या शिक्षकांनाही कागदपत्रे अपलोड करावी लागणार.” शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपूर जिल्ह्यातील ६२० शिक्षकांची बोगस नियुक्ती करण्यात आल्याचे पुढे आले होते. या शिक्षकांनाही शालार्थ आयडीचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहेत. या शिक्षकांच्या कागदपत्र पडताळणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षण आयुक्त यांच्या या आदेशाने बीड जिल्ह्यातील अशा प्रकारचे गैरप्रकार केलेल्या संस्थाचालक आणि शिक्षकाना धडकी भरली असून, बोगस आणि बनावट शालार्थ आयडी घेऊन शासनाचा बेकायदेशीर पगार उचलणारे संस्था चालक आणि शिक्षक धास्तावलेले दिसत आहेत. जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक विभागात मिळून किमान दोन हजार बोगस शिक्षक आणि कर्मचारी यांची भरती करण्यात आली असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून. अनेक संस्था चालकांनी तर, मंजुरी यादीत नाव नसताना सदर यादीत नाव घुसडून टप्पा अनुदानाचा मोबदलाही उचलला असल्याचे उघड होणार आहे. 2012 ते 2025 या काळात कार्यरत असलेल्या आणि सेवनिवृत्त झालेल्या किंवा बदली झालेल्या शिक्षणाधिकारी यांच्या मागील तारखेत सह्या घेऊन बोगस शिक्षक भरती करण्यात आले आहेत. राज्यव्यापी शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने या प्रकरणात स्थापन होत असलेल्या विशेष चौकशी पथक म्हणजेच स्पेशल “एस आय टी” बरोबरच आता शिक्षण आयुक्त यांनी काढलेल्या या आदेशामुळे बनावट शिक्षण सम्राट आणि बोगस नियुक्त शिक्षकांचे पितळ उघडे पडून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील काळया बाजाराचे पोलखोल होणार आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.