केज तालुक्यातील नांदूरघाट येथील विराट सभेत बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी केली स्वतःची भुमिका स्पष्ट.
केज: बीड लोकसभेचे निवडणूक “कुरुक्षेत्र” सोशल मिडीयाच्या माध्यमातून केवळ आरक्षणाच्या बुरख्याआडून जातीयवादाचा डोंब पेटवून तापवले जात असले तरी,महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी जातीयवादाच्या अडसरावर मात करत जिल्ह्यात ठिकठिकाणच्या सभेतून आपली रास्त भुमिका जनतेसमोर मांडत विरोधकांना निवडणूक “कुरुक्षेत्रावरुन” “सळो की पळो” केल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागलेआहे.
विविध ठिकाणच्या सभेतून बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, मी पाच वर्ष मंत्री म्हणून काम केले. पराभवानंतरही जनतेची सेवा केली. जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी अगोदर पायाभूत सोयी केल्या. रेल्वे आली, महामार्ग झाले आता उद्योगही आणता येतील. मला जिल्हाला दुष्काळमुक्त करायचंय. त्यासाठी मला विजयी करा, असं आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार यांनी ठिकठिकाणच्या सभेमधून केले. पंकजा मुंडे यांच्या केज(नांदूरघाट) चिंचाळा (वडवणी), आसरडोह (धारूर), विडा (केज) येथे सभा झाल्या. पंकजा मुंडे पुढे बोलतांना म्हणाल्या, “आम्ही माणूस बघतो, जातीपातीला आमच्याकडे स्थान नाहीच. विकास हेच॔ आमचे तत्व आहे. देशाचे कणखर नेतृत्व असलेले नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. मोदींच्या रुपाने वर्षानुवर्षे देशासाठीचा नेता आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी निवडणूकीत संधी देवून मला संसदेत पाठवण्याची गरज आहे.
निवडणूका जवळ आल्या की, विरोधकांकडून जातीवादाचा मुद्दा पुढे केला जातो हे तुम्ही बघत आहात, मराठा – मुस्लिम बांधवांनी विरोधकांच्या भूलथापांवर विश्वास ठेवू नये, पाच वर्ष मला बीड जिल्ह्याची सेवा करण्याची संधी द्या, तुमच्या विश्वासाला पात्र ठरेल.” “माझ्या पित्याने जिल्ह्याच्या विकासासाठी आयुष्य खर्ची केलं. त्यांच आपल्याला सोडून जाण्याचे शल्य माझ्या मनात आहे. त्यांनी मला घडवले, संघर्ष शिकवला, त्यांच्याच विचारांनी मी वाटचाल करते आहे. मी दिल्लीतून तुमची काळजी घेईल. माझं अन् तुमचं नातं कधीच तुटणार नाही. घडी गेली की, पिढी जाते, सर्व प्रश्न मार्गी लागतील. पण, ही संधी आपल्या सर्वांच्या जीवनात पुन्हा येणार नाही,” असं भावनिक उदगार पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून काढले. “बीड जिल्ह्यात रोजगार, उद्योग आणून तरुणांना जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करुन देईन. मात्र, आता उगाचच विरोधक मुस्लिम आणि मराठा समाजातील लोकांची दिशाभूल करत आहेत. या अपप्रचाराला तुम्ही मतदारांनी बळी पडू नका. माझ्यावरची माया कमी करु नका, शंभर टक्के मला मतदान करा.विरोधक बीड जिल्ह्य़ात जातीयवादाचे विष पेरुन जनतेची दिशाभूल करीत आहेत. “मी पालकमंत्री असताना जिल्ह्यातील शेतकर्यांना अधिकाधिक विमा मिळावा म्हणून काम केल्याचं तुम्हाला माहितआहे, माझ्या शेतकर्यांची जीवापाड काळजी घेतली. विविध ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी तेथे निधी दिला, रस्ते, इमारतींसाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करुन दिला. ही सर्व कामे जनतेला दिसतात. त्यामुळे पाच वर्ष मला जिल्ह्याची सेवा करण्याची संधी द्या, तुमच्या विश्वासाला पात्र ठरेन. आपल्याला एकदा दूध पोळलं आता ताकही फुंकून प्यायचं आहे. निवडणूक सुरु आहे, म्हणून आरामात बसू नका, डोळ्यात तेल घालून सतर्क रहा,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. “मला कोणतेही पद मिळवायची हौस नाही. मला काहीही कमवायची इच्छा नाही. मला जनतेचा विश्वास, आशीर्वाद अन् प्रेम मिळालं आहे. सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सामान्यांना सर्व घटकांना पुढे घेवून जाते आहे. सर्व जाती-धर्माच्या समाजाला पुढे घेवून जाण्यासाठी मी काम करते,” असंही पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटल आहे.”
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.