ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

परळीच्या राजकारणात मुंडे भावंडांचे सकारात्मक बिजारोपन!! —————————————- *कोण ? कोठून ? लढणार हे सध्या तरी अनिश्चित* ? ———

परमेश्वर गित्ते : परळी वै.

  1. परळीच्या राजकारणात मुंडे भावंडांचे सकारात्मक बिजारोपन!!

—————————————- *कोण ? कोठून ? लढणार हे सध्या तरी अनिश्चित* ? —-———————————— *प्रासंगिक –                                             (परमेश्वर गित्ते):::: महाराष्ट्रात बारामती नंतर लक्षवेधी राहिलेल्या आणि गेल्या 40 वर्षाच्या राजकारणात केंद्र बिंदू राहिलेल्या परळी विधानसभा मतदार संघात दि. 5 डिसेंबर रोजी महत्वाचा आणि इतिहासाला नोंद घेणारा प्रसंग घडला. गेल्या 12 वर्षापासून राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणारे मुंडे कुटूंबिय हे प्रथमच एकत्र आले . ना.धनंजय मुंडे व माजी मंत्री पंकजाताई मुंंडे यांनी मतभेद बाजूला ठेवत परळी शहराच्या विकासासाठी एकत्र येवून कार्यक्रमाला हजेरी लावली. ही घटना व प्रसंग तसा भावनिक बनला परंतु परळीच्या राजकारणात मुंडे भावंडांनी या निमित्ताने सकारात्मक बीजारोपन केल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमानंतर उमटली. 19 जानेवारी 2012 रोजी ना.धनंजय मुंडे यांनी लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्याशी फारकत घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत परळी येथील तोतला मैदानावर प्रवेश केला. तेथून परळीच्या राजकारणाल कलाटणी मिळाली तेव्हापर्यंत गोपीनाथराव मुंडे विरुद्ध प्रा.टि.पी.मुंडे, फुलचंदराव कराड अशी लढत पाहायला मिळत होती. परंतु धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कुटूंबातील ही लढत परळीकरांना पाहायला मिळाली. नाही ते आरोप आणि नाही त्या घटना त्या दरम्यानच्या काळात घडल्या. परळीकर हे सारं उघड्या डोळ्यांनी पाहत होते परंतु कोणी प्रतिक्रिया देत नव्हते.एकाच कुटूूंबातील संघर्ष असल्याने त्यावर कोणी भाष्य करत नव्हते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी निवडणुक लढविली त्या ठिकाणी धनंजय मुंडे हे 24 हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. पराभूत झाल्यानंतर धनंजय मुंडे हताश झाले नाहीत किंवा घरी बसणे पसंत केले नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा सन्मान करत विधानपरिषदेवर घेत त्यांना विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळायला दिली. प्रामाणिकपणे आणि तेवढ्याच ताकदीने त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचा राज्यभर प्रभाव दिसून आला.

विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहाला नामोहराम करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून आला. महाराष्ट्रातील त्या काळात ज्या- ज्या काही घटना घडल्या त्या ठिकाणी जावून न्याय देण्याचे काम केले. स्वतःची इमेज त्यांनी निर्माण केली. जेवढ्या मतांनी ते पराभूत झाले म्हणजे 24 हजार मतांनी पराभूत होवून तो विजय त्यांनी 30 हजार मतापर्यंत परावर्तीत केला. त्यासाठी मतदारसंघातील सामान्य जणांचे प्रश्न व अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान पंकजाताईंची प्रतिमा त्यांच्या सहकार्यांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून म्हणावी तशी जपली गेली नाही किंवा त्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. पंकजाताईंच्या स्वभावाचे पैलू भेटण्यास आलेल्या लोकांना सांगून गैरसमज निर्माण करण्यात आले त्याचा फटका विधानसभा 2019 च्या निवडणुकीत बसला आणि त्या पराभूत झाल्या. त्यानंतर कोरोनासारखी महामारी आली त्यामुळे जनसंपर्क तुटला लोकांच्या गाठीभेटी कमी झाल्या. परंतु त्या दरम्यान त्यांनी 3 जून, 12 डिसेंबर, दसरा मेळावा असे कार्यक्रम घेवून आपली लोकप्रियता व नेतृत्व सिद्ध केले.

राजकारणातील बदलती परिस्थिती लक्षात घेवून आणि 2 जुलै 2023 नंतर झालेले महाराष्ट्रातील परिवर्तन पाहता आता दोन्ही भावंडांनी एकत्र येवून हातात हात घालून परळी शहराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवण्याची भुमिका घेतली. या घटनेला व प्रसंगाला मोठी किनार आहे. कारण मधल्या काळात पंकजाताई भाजपापासून खूप दूरावल्या किंवा पक्षाकडून त्यांना अपेक्षित सन्मान मिळू शकला नाही ही त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना होती पंकजाताई वेगळी भुमिका घेतील अशीही चर्चा मध्यंतरी होती. परंतु या सर्व चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. 5 डिसेंबर रोजी परळी येथे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या ‘ शासन आपल्या दारी ‘ या कार्यक्रमासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला पंकजाताई उपस्थित राहणार अशी चर्चा होती ती खरीही ठरली स्वतः पंकजाताई मुंडे या मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या विमानात मुंबईवरुन सोबत आल्या. त्यानंतर नांदेड येथे विमान आल्यानंतर नांदेडहून हेलिकॉप्टरने गोपीनाथगड या ठिकाणी गेल्या त्याठिकाणी तीन्ही मान्यवरांनी गोपीनाथगडाचे दर्शन घेतले व स्वतः पंकजाताईंनी तीन्ही मान्यवरांचे स्वागत करुन गोपीनाथगडाची प्रतिमा भेट दिली. सर्व मान्यवर गोपीनाथगडावरुन थेट वैद्यनाथाचे दर्शन घेवून ‘ शासन आपल्या दारी ‘ कार्यक्रमाचे ठिकाणी उपस्थित राहिले त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बोलतानां सांगितले की, धनंजय मुंडे जेवढे माझ्या जवळचे आहेत तेवढेच देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा जवळचे आहेत. त्यावरुन धनंजय मुंडे यांची उंची वाढली. तर देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांनी परळीच्या आणि बीड जिल्ह्याच्या विकासासाठी भरपूर काम करावे राज्य सरकार आपल्याला कशाचीही उणीव भासू देणार नसल्याचे आश्वासित केले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा याठिकाणी विकास कामासाठी आम्ही मुंडे भावंडांच्या पाठिशी उभे आहोत असे सांगितले.

पंकजाताई मुंडे ज्यावेळी व्यासपीठावर आल्या त्यावेळी मोठ्या प्रमाणात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उपस्थितांचे लक्ष वेधले गेले या व्यासपीठावरुन पंकजाताई मुंडे यांनीसुद्धा संबोधित केले आणि म्हणाल्या की, परळी मतदारसंघाच्या विकासासाठी मी आणि धनंजय मुंडे खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत. धनंजय मुंडे यांनीसुद्धा पंकजाताई मुंडे व मी कसलेही किंतु-परंतु मनात न ठेवता मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. हा प्रसंग तसा अनेकांना दुर्मिळ वाटायचा परंतु हे सत्यात घडवून आल्याची किमय्या घडली आहे. दोन्ही भावंडांनी मनाचा मोठेपणा दाखवत तु-तु-मैं-मै न करता अंतर्गत संघर्ष बाजूला ठेवून किंवा वेळप्रसंगी कायमची कटुता संपावी म्हणून हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जो आजच्या काळात महत्वाचा आणि गरजेचा आहे. जेव्हा दोघेही व्यासपीठावर आले त्यावेळी अनेकांच्या भूवया उंचावल्या. कोण?कोठून? लढणार हे अद्याप स्पष्ट नाही तसेच रणनीती कशी किंवा काय असेल हे स्पष्ट नसले तरी उद्याच्या काळासाठी हे महत्वाचे ठरले आहे. भूमिका काय असणार असे संकेत दोघांकडूनही मिळाले नाहीत मात्र माध्यमे सध्या वेगवेगळे कयास लावून संशोधन करत आहेत. कोणी पंकजाताईंना पाथर्डीचा तर कोणी गंगाखेडचा पर्याय सुचवला आहे तर कोणी बीड लोकसभेचा पर्याय सुचवला आहे. या सर्व गोष्टी वर-वरच्या आहेत ज्या दिवशी निवडणुक जाहिर होईल त्यानंतर दोघांचीही अंडरस्टॅडिंग लक्षात येईल. पण दोघे एकत्र आले ही खूप मोठी घडामोड आणि प्रसंग आहे एवढे मात्र खरे ! या भावंडांनी परळीच्या राजकारणात जी सकारात्मक बीजे पेरली आहेत ती उद्याच्या परळीसाठी महत्वाची मानली जातात…!

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये